शुक्रवार, ३ मे, २०२४

मतदार संघाबाहेरील प्रचार कार्यकर्त्यांनी ५ मे नंतर सांगली लोकसभा मतदार संघात थांबू नये - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. ३ (जि.मा.का.) :- सांगली जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक विना अडथळा व भयमुक्त वातावरणात आणि नि:पक्षपातीपणे पार पडण्याच्या दृष्टीकोनातून भारत निवडणूक आयोगाकडील सूचनांनुसार ४४-सांगली लोकसभा मतदारसंघाबाहेरील मतदार संघातून आलेले राजकीय कार्यकर्ते, पक्ष कार्यकर्ते, सभेचे कार्यकर्ते, प्रचार कार्यकर्ते की, जे या मतदार संघातील मतदार नाहीत अशा व्यक्तींनी दि. ५ मे रोजी सांयकाळी ६ वाजलेनंतर मतदारसंघाबाहेर स्‍व:ताहून निघून जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. सांगली जिल्ह्यासाठी दि ७ मे रोजी मतदान होत असून निवडणूक प्रचाराचा कालावधी दि. ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता संपत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात फिरती पथके (फ्लांईग स्‍क्‍वाडस्) व स्थिर संनिरिक्षण (एस.एस.टी) अधिक दक्ष असून 50,000 रुपये पेक्षा जास्त रक्कम किंवा मौल्यवान धातू, सोने, चांदी / भेटवस्तू, जवळ बाळगणाऱ्या व्यक्तींनी सदर मालमत्ते संदर्भातील कागदपत्रे जवळ बाळगावीत,असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. उमेदवार व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे पालन करावे मतदानाच्या अगोदर तीन दिवसापासून मतदान समाप्त होण्यापूर्वीच्या ४८ तासापर्यंत उमेदवाराच्या प्रचार मोहिमेची तीव्रता वाढत असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. निवडणूक आयोगाच्‍या निर्देशांनुसार कल्‍याण मंडप, कम्‍युनिटी हॉल, मंगल कार्यालये, लॉज, गेस्‍टहाऊसची कसून तपासणी करणेबाबतचे निर्देशही त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. मतदारसंघाच्‍या हद्दीवरील चेक पोस्‍टच्‍या माध्‍यमातून सांगली जिल्‍हयामध्‍ये कार्यरत फ्लांईग स्‍क्‍वाडस् व एस.एस.टी.पथकाच्‍या माध्‍यमातून मतदार संघात येणा-या वाहनांची तसेच कोणतीही व्‍यक्‍ती किंवा व्‍यक्‍तींचा समूह मतदार संघातील असलेची खात्री करणेसाठी ओळखपत्रांची कसून तपासणी करण्यात येत आहे. निवडणुकीच्‍या अनुषंगाने लाच देणे-घेणे, उमेदवारांना, मतदारांना, कोणत्‍याही व्‍यक्‍तीला इजा पोहचवणे, धमकावणे भारतीय न्‍याय संहितेच्‍या कलम 171 बी व कलम् 171 सी नुसार गुन्‍हा असून असे गुन्‍हे करणारी व्‍यक्‍ती, दोन वर्षांपर्यंतचा तुरूंगवास, किंवा द्रव्‍यदंड किंवा दोन्‍ही शिक्षा याप्रमाणे शिक्षेस पात्र असेल. जिल्‍हा निवडणूक अधिकारी कार्यालयात तक्रार नियंत्रण कक्ष 24 तास सुरू आहे. निवडणुकीचे अनुषंगाने, लाच देण्या - घेण्याबाबत, धमकावल्याबाबत कोणतीही माहिती मिळाली तर नागरिकांनी त्‍वरीत 1800 233 1801 या दूरध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधून जिल्‍हा निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती दयावी तसेच cVIGIL ॲपवर फोटो/व्हिडीओसह तक्रार दाखल करता येईल. जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसं‍हिता कक्षाच्‍या mcc.sangli@gmail.com या मेल आयडीवरही तसेच, 0233 – 2600185 या दुरध्‍वनी व 1950 या टोल फ्री क्रमांकावर देखील तक्रार दाखल करता येईल. नागरिकांना जिल्‍हास्‍तरावरील तक्रार नियंत्रण कक्ष (24×7) येथेही समक्ष तक्रार दाखल करता येईल . मतदान करण्याचे आवाहन जिल्ह्यात येत्‍या ७ मे रोजी सकाळी ७ ते संध्‍याकाळी ६ या वेळेत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून प्रत्‍येक मतदाराने मतदान करून लोकशाही समृद्ध करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले. ०००००

सायकल रॅलीतून मतदार जागृती

सांगली (जि.मा.का.) दि. 3 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी जिल्हयात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी आज सांगली शहरातून सायकल रॅली काढून मतदार जागृती करण्यात आली. विश्रामबाग चौक येथून सुरू करण्यात आलेल्या या सायकल रॅलीस जिल्हास्तरीय स्वीप समितीचे नोडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला. जिल्हा प्रशासन व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने मतदार जागृतीसाठी काढण्यात आलेली ही सायकल रॅली विश्रामबाग चौकातून शंभर फुटी रोड, कोल्हापूर रोड(आकाशवाणी) एस.टी.स्टँड, मारूती चौक, हरभट रोड, टिळक चौक्, गणपती मंदिर, पटेल चौक, राजवाडा चौक, स्टेशन रोड मार्गे जाऊन शिवाजी स्टेडीयम येथे सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला. ०००००

बीएलओंनी घरोघरी भेट देऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करावे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली (जि.मा.का.) दि. 3 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये सांगली लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी बीएलओंनी घरोघरी भेट देऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या. स्वीप उपक्रमांतर्गत सुरू आलेल्या उपक्रमांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज आढावा घेतला. या आढावा बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे यांच्यासह सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी, जिल्हास्तरीय स्वीप समितीचे नोडल अधिकारी व सर्व गट विकास अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी म्हणाले, जिल्ह्यात लोकसभेसाठी होणाऱ्या मतदानाची टक्केवारी वाढून जिल्ह्याचा वेगळा आदर्श निर्माण व्हावा. मतदान टक्केवारी वाढीसाठी घंटा गाडीवरून मतदार जागृती करावी. संकल्प पत्राचे वाटप करावे. मतदान केंद्रावर सेल्फी पॉईंट लावावेत. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यांनी गट विकास अधिकारी यांचेकडून दिव्यांग मतदारांसाठी वापरण्यात येणाऱ्या व्हीलचेअर बाबतचाही आढावा घेऊन मार्गदर्शन केले. ०००००

मतदान प्रक्रिया सुरळीत व सुलभ होण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी घेतला निवडणूक कामकाजाचा आढावा सांगली (जि.मा.का.) दि. 3 :- 44- सांगली लोकसभा मतदार संघात येत्या 7 मे रोजी मतदान होत असून मतदान प्रक्रिया सुलभ, सुरळीत आणि निर्भयपणे पार पाडण्यासाठी सुक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, लोकसभेसाठी होणाऱ्या मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी यांची भूमिका महत्त्वाची आहे. मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना आवश्यक प्रशिक्षण दिले आहे. यामुळे त्यांनी त्यांच्यावर दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मतदान केंद्रावरील सुविधांबाबतही आढावा घेतला. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प व व्हील चेअर, पाणी व सावलीची सोय, आरोग्य विषयक अत्यावश्यक कीट उपलब्धता, मतदान केंद्रांवरील वेब कास्टिंग, वाहतूक आराखडा यासह मतदान केंद्रांवरील कर्मचारी वाहतूक व्यवस्था, रूट नुसार पार्किग या बाबींचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. ०००००

मतदान व मतमोजणी दिवशीचे आठवडा बाजार पुढे ढकलले

सांगली, दि. 3 (जि. मा. का.) : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे मतदान मंगळवार, दि. 7 मे व मतमोजणी मंगळवार, दि 4 जून रोजी होणार आहे. मतदान व मतमोजणीच्या दिवशी एकूण 40 गावात आठवडा बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात एकत्र जमाव गोळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदान व मतमोजणी शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने व सार्वत्रिक सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता मतदान व मतमोजणी सुस्थितीत पार पाडण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दि. मार्केट ऍन्ड फेअर्स ऍक्ट १८६२ (सन १८६२ चा मुंबई कायदा क्रंमाक ४) च्या कलम ५ व ५ अ, अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत मतदान व मतमोजणी च्या दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार तसेच इतर कोणत्याही गावात / ग्रामपंचायत हद्दीत आठवडा बाजार भरत असल्यास सदर आठवडा बाजार, पुढे ढकलण्यात येवून ते गुरुवार, दि. 9 मे व 6 जून 2024 रोजी भरविण्याचे आदेश दिले आहेत. 000000

मतदान केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

सांगली, दि. 3 (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे मतदान दि. 7 मे 2024 रोजी होणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, जिल्ह्यात शांतता रहावी, तसेच जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित रहावी, या करीता प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्ह्यातील सर्व 2 हजार 448 मतदान केंद्राच्या इमारतीपासून 200 मीटर सभोवतालचे परिसरात दि. 7 मे 2024 रोजीचे सकाळी 06.00 वाजल्यापासून ते संबंधित मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया संपेपर्यंत पुढील कृत्ये करण्यास मनाई केली आहे. पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गटागटाने फिरणे, एकत्रित गटागटाने फिरणे व उभे राहण्यास मनाई केली आहे. झेरॉक्स मशीन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशीन, ध्वनीक्षेपक यांचा वापर करणेस मनाई केली आहे. तसेच मतदान केंद्रात मोबाईल, पेजर वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश निवडणूक कर्तव्य बजावीत असणाऱ्या शासकीय कर्मचारी / अधिकारी यांना लागू असणार नाही. हा आदेश दि. 7 मे 2024 रोजीचे सकाळी 06:00 वाजल्यापासून ते संबंधित मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. 000000

स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे यांची आज सांगली आकाशवाणीवर मुलाखत

सांगली दि.3 ( जि.मा.का.) : जिल्ह्यातील ' मतदार जागृती मोहीम ' या विषयावर स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सांगली) शशिकांत शिंदे यांची मुलाखत आज शनिवार, दि. 4 मे रोजी सकाळी 10.15 वाजता आकाशवाणी सांगली केंद्रावर प्रसारित होईल . ही मुलाखत 1251 किलोहर्टझ या ए.एम. वाहिनीवर, तसेच 100.6 एफ एम वर आणि न्यूज ऑन ए आयआर या मोबाईल ॲपवर ऐकता येईल. जिल्हा प्रशासनातर्फे मतदार जनजागृतीसाठी आखण्यात आलेल्या विविध मोहिमा, या विषयावर जिल्हा माहिती अधिकारी फारूक बागवान (सांगली ) यांनी ही मुलाखत घेतली आहे . मतदान टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती श्री . शिंदे यांनी या मुलाखतीमध्ये विशद केली आहे. 0000000